न्यु ईरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित व शरद तांदळे लिखित 'रावण राजा राक्षसांचा' ही कादंबरी लंकाधिश दशाननाच्या चरित्रावर आधारित जरा हटके पण तितकीच विचारात गुंतवणारी एक वेगळी निर्मिती आहे. शरद तांदळे यांनी त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात मराठी वाचकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करुन मराठी साहित्यासाठी आपलं योगदान दिलं आहे. जानेवारी २०१८ ला प्रकाशित झालेल्या या कादंबरीला अल्पावधीतच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कादंबरीचे मुखपृष्ठ हे अभिषेक अवचार यांनी साकारलं असुन अंतर्गत सजावट व मुद्रितशोधन सौ. हेमलता थिटे यांनी केलं आहे. ४३२ पृष्ठसंख्या असलेल्या या कादंबरीत लेखकानं रावणाच्या अनेक कलावगुणांचे विश्लेषण केले आहे.
रावण म्हटला की आपल्या दृष्टीसमोर एक क्रूर भयानक चेहरा नजरेस येतो. पण खरंच रावण ईतका अधर्मी होता का..? अश्या खूप सार्या प्रश्नांची उत्तरं लेखकाने या कादंबरीतून सादर केली आहेत. नकारात्मक दृष्टिकोन ठेऊन पाहिलेल्या व्यक्तीचा इतिहास प्रथमच सकारात्मक दृष्टीतून मांडण्यात आला आहे. याची सुरुवात ही दशग्रीवाच्या (रावण) बालपणातल्या कटू आठवणींपासून झाली आहे. कैकसी-विश्रवा पुत्र रावण जन्मतःच अनार्य दासीपुत्र असल्यामुळं आपण कधीच आर्य होऊ शकत नाही याची चीड त्याला येत असते आणि त्या एकाच गोष्टीनं त्याच्या आयुष्याचं ध्येय हे इतरांपेक्षा वेगळे होऊन जातं. त्याच्यात जन्मतःच नेतृत्व करण्याची कला असल्यामुळे त्याने वेदिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या पराक्रमाची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली. त्याला ज्या देव-ऋषीप्रधान संस्कृतीनं अनार्य म्हणुन हिणवलं होतं त्यांच्या विरोधात बंड पुकारून स्वबळावर त्यानं देवांना पराभूत केलं. बुद्धीच्या जोरावर साम्राज्य उभं करुन त्यानं दैत्य, दानव, असुर व कित्येक भटक्या जमातींना एकत्रित करुन राक्षस संस्कृतीचा पाया रचला. स्वतःद्वारे निर्माण केलेल्या रावणसंहितेच्या आधारे त्यांना जगण्याची कार्यपद्धती शिकवली.
रावणाच्या शासनकाळात लंकेचे वैभव हे शिगेला पोहोचलं होतं. त्याने जनतेसाठी सोन्याची भवनं निर्माण केली. बुद्धिबळ, रुद्रवीणा, रावणसंहिता, कुमारस्तोत्र, शिवतांडवस्त्रोत यांचा निर्माता रावण हा मोठा शिवभक्त सुद्धा होता. तसेच त्याने दर्शन, व्यापार, आयुर्वेद, राज्यशास्त्र यांसारख्या अनेक विषयात पांडित्य मिळवले होते. एक उत्कृष्ट वास्तुशास्त्रज्ञ, कुशल राजनीतिज्ञ म्हणुन त्याने त्रिखंडात कीर्ती मिळवली. त्याने शक्तिशाली आरमार व अफाट सैन्याची उभारणी केली होती. पण तरीही दुर्गुणी, अवगुणी म्हणुनच त्याची हेटाळणी आजही होत आहे. रावणाला संगीताची खुप आवड होती. त्याला एकुण अठरा संगीतप्रकार ज्ञात होते. भारतीय संगीतातील संगीत रागाचं मुळ असणारा रावणपट्टी हा राग दक्षिण भारतात खूप प्रसिद्ध आहे. मध्य भारतात रावणाची असंख्य मंदिरे असून आजही तिथे त्याची पूजा केली जाते.
सीतेचे अपहरण केले पण तिच्या संमतीशिवाय तिच्या पवित्र शरीराला कधी स्पर्श केला नाही. त्याला अहंकार होता हे मान्य पण त्याला पश्चाताप होता हेही मान्य करावंच लागेल. रावणाच्या मृत्युसमयी प्रत्यक्ष रामाने लक्ष्मणाला त्याच्याकडे पाठवून ज्ञान ग्रहण करण्यासाठी सांगितले आणि रावणाने देखील लक्ष्मणाला आपला शिष्य म्हणुन स्विकारले होते. अश्या तेजस्वी राजाचे आज कित्येक वर्षे दहन होत असले तरी इतिहासाच्या हजारो पानांमधुन तो कधीही पुसला जाऊ शकत नाही. त्याच्या पराक्रमाचा सूर्य इतिहासाच्या पानावरून कधीही मावळणार नाही. रामायणात खलनायक ठरलेल्या रावणाची दुसरी बाजू हे पुस्तक दाखवतं. या कादंबरीतून त्याची हळवी बाजू मांडण्यात आली आहे.
हे पुस्तक आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन खरेदी करता येईल.
Amazon.in
Flipkart.com
या संदर्भातील युट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ConversionConversion EmoticonEmoticon