अगस्ती ऋषींचा संदर्भ निघाला की आपल्या दृष्टीसमोर त्यांची दोन कार्य प्रामुख्याने येतात. एक तर तीन आचमनात केलेले समुद्रप्राशन व दुसरं ज्योतिष शास्त्रातला उत्तम अविष्कार नाडीग्रंथ भविष्य. पण या महान तपस्वीचे आयुष्य काही एवढ्यातच सीमित नाही आहे, तर त्याहीपेक्षा खुप मोठं, असामान्य असं ज्ञान त्यांनी येणार्या पिढीच्या ओंजळीत टाकलयं. एकूण त्याचं सारं जिवनच अलौकिक स्वरूपाचे होतं.....!
ऋषीय कार्यातून निर्माण झालेल्या वेदिक-आर्य संस्कृतीचं आपल्या भारतवर्षातील स्थान हे ध्रुव तार्यासारखं अढळ असावं अशी धारणा असलेल्या अगस्ती मुनींचा जिवनपट राजेंद्र खेर यांनी या कादंबरीत प्रस्तुत केला आहे. मंजुळ पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या या कादंबरीमधील सर्व छायाचित्रं ही देविदास पेशवे यांच्या कुंचल्यातून साकार झाली आहेत. मुख्यतः मुखपृष्ठवरील मांदार्यांचं चित्र आकर्षक तर आहेच पण विलक्षण बोलकं सुद्धा आहे.
कादंबरीचा कालखंड हा सुमारे १० हजार वर्षांपूर्वीचा असण्याचा अंदाज लेखकाने स्पष्ट केला आहे. मिळालेल्या जुन्या धर्म ग्रंथांमध्ये, तसेच ऐतिहासिक दस्तावेज व वर्तमान काळात अस्तित्वात असणार्या वास्तु किंवा स्थळे, त्याचबरोबर जुन्या पौराणिक कथा यांच्या माध्यमातून याला एका माळेमध्ये गोवण्याचा यशस्वी प्रयत्न येथे झालेला दिसून येईल. ही कादंबरी रामायण कालखंडाच्या समकालीन असल्याने रामावतार ते रावणवध यामध्ये होणार्या सर्व घडामोडींमध्ये मांदार्यांची भूमिका प्रमुख असल्याचे विस्तृत वर्णन यामध्ये लेखकाने मांडले आहे. मांदार्यांचं बालपण हे वायव्येकडच्या दूरदेशी अर्थात सुर्यदेशी (आजच्या सिरीयात) व्यतीत झालं होतं. अतिशय तीक्ष्ण बुद्धी, चौकस दृष्टी व विचारी मन असल्यामुळे त्यांची आकलनक्षमता विलक्षण होती. अल्पावधीतच त्यांनी सर्व वेदांचे ज्ञान संपादित केले. पण असं काय घडलं..? ज्यान त्यांना देवांकडून शाप मिळाला आणि त्यांना शिक्षा म्हणून ऋषीय कार्य करण्यासाठी 'मर्त्य' लोकात जाण्यासाठी सांगितलं. आणि हे देव म्हणजे नक्की होते तरी कोण…? त्यांचं वास्तव्यस्थान कुठे होतं..? अशे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असतील तुमच्या मनात….!
मांदार्यांनी मात्र या कार्याकडे परमेश्वराचं कार्य म्हणुन पाहिलं आणि त्यात आपलं योगदान देण्याचं मनोमन ठरवलं. त्यांनी हिमवान पर्वतापासून दक्षिण सागरापर्यंत अन् पश्चिम सागरापासून पूर्वेच्या उपसागरापर्यंत ऋषीय कार्यचं बीज पेरण्याचं शिवधनुष्य उचललं. राक्षस-असुर-दैत्य-दानवादी तसेच नरमांसभक्षक या सर्वांना ऋषीय कार्यचं महत्व समजावं म्हणुन त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण भारतवर्षात सांस्कृतिक कार्याची स्थापना केली. शस्त्रापेक्षा शास्त्रावर विश्वास ठेवून त्यांनी आपले ज्ञान देण्यास सुरुवात केली. पण जेव्हा जेव्हा शस्त्र उचलण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी यत्किंचितही विचार केला नाही. कालकेय दानवाचा निःपात करताना त्यांनी अक्षरशः सागराला दिलेलं आव्हान लेखकानं कलात्मकरित्या रचले आहे.
मध्य आशियात घडलेलं राजकारण, वृतासुराचे देवांशी असलेलं वैर, उरूवासी (आजचे इराक) विष्णुदेव यांचा या सर्व कार्यात असलेला सहभाग या शिवाय ही कादंबरी पूर्ण होऊच शकत नाही. प्रत्यक्ष देवांनाही हेवा वाटावा असं सामर्थ्य मांदार्यांना लाभलं. साक्षात विंध्याला नमवून दंडकारण्यातून दक्षिण दिग्विजयाचे पहिले पाऊल त्यांनी टाकले. तेथून पुढे ते 'अगस्ती' ऋषी म्हणुन ओळखू जाऊ लागले. दक्षिण दिग्विजय म्हणजे रावणाचा पराभव करण्यासाठी देवांकडून केलेला एक कट होता. त्यासाठी दक्षिण भारतात ऋषीय कार्याचे प्रयोजन हे अगस्ती ऋषींनी केले. लोपामुद्रा या विदर्भ राजकन्येशी झालेला त्यांचा विवाह आणि त्यांच्या पुढील आयुष्यात ऋषीपत्नी म्हणुन तिचे स्थान हे अगस्तींच्या आयुष्याला पूर्णत्व प्राप्त करुन देते. एकूणच कादंबरीचा विषय आणि आशय लक्षात घेता मराठीमधील वाचकांना एक नवीन आणि वेगळा अनुभव घ्यायला मिळेल.
ConversionConversion EmoticonEmoticon