तेलाच्या इतिहासाची रंजक माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर गिरीश कुबेर यांची मराठीमधील दोन पुस्तकं चांगली प्रसिद्ध आहेत. त्यातील पाहिले 'तेल नावाचा इतिहास' तर दुसरे ज्याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत ते 'एका तेलियाने'. मार्च २००९ मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक 'राजहंस प्रकाशन' यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले असुन या पुस्तकाचे मुखपृष्ठ हे कमल शेडगे यांनी रेखाटले आहे. २४८ पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकात एका महान व्यक्तीच्या जागतिक तेलकारणातील योगदान बद्दलची माहिती इथे देण्यात आली आहे. कोणत्याही मोजमापात बसु न शकणारं त्यांच्या अफाट कर्तृत्वाला साजेसं व्यक्तिमत्व जगासमोर आजही उभं आहे. .
'शेख अहमद झाकी यामानी' हे सौदी अरेबिया या देशाचे तेलमंत्री म्हणुन संपूर्ण दुनियेमध्ये ओळखले जातात. सौदीच्या इतिहासातील एक नाव..! देशाच्या प्रगतीत या व्यक्तीनं खूप मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या वादळी आयुष्यावर आधारित ही कहाणी. आपल्या देशात पिकणारं तेल हे अस्त्र ठरु शकतं, हे त्यांनी पहिल्यांदा ओळखलं. काही सालांपूर्वीचा सौदी देश म्हणजे एक मागास अरब देश म्हणुन गणला जायचा. परंपरागत चालत आलेल्या पुरातन रुढींना बाजूला सारून जगाशी स्पर्धा करण्याची मानसिकता तयार करण्यात यामानी यांचं योगदान हा देश कधीही विसरू शकत नाही. वडील सर्वमान्य पंडित व सरकारचे धर्मगुरू असल्यामुळे कुराणचा यामानी यांच्यावर प्रभाव तर होताच पण पुढील उच्चशिक्षण हे अमेरिकेत झाल्याने त्यांना पाश्चात्य गोष्टींमधील नावीन्यपूर्ण माहिती जाणून घेण्यात खूप आवड निर्माण झाली. सौदीच्या राजघराण्यात राजे फैजल यांच्या विचारांशी त्यांचे खूप साम्य असल्याने यामानी हे त्यांचे सख्खे स्नेही झाले होते.
या तेलाच्या राजकारणात काहीवेळा परिस्थिती एवढी बाहेर गेली होती की अक्षरशः तिसर्या महायुद्धाची पार्श्वभूमी तयार झाली होती. वाळवंटातील देशांचं राजकारणच नव्हे त्यांची एकूण प्रगती या तेलावर अवलंबुन होती. पण त्याचा सदुपयोग कसा करावा याची धोरण कोणाकडेही नव्हते अपवाद सौदी अरेबिया. यामानी यांना ते पूर्णतः माहीत होते पण त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले. यात त्यांचावर जीवघेणे हल्ले झाले. जागतिक आंतरराष्ट्रीय दहशतवादी कार्लोस याच्याकडून अपहरण झाले पण पुढील दोन दिवसांत यामानी व इतर जणांना सोडून देण्यात आले. त्यानंतर राजे फैजल यांचा त्यांच्या एका नातेवाईकाकडून खूण झाल्याने यामानींचा सर्वात मोठा आधार गेला आणि आधीच नको झालेले यामानी हे या प्रवाहातून बाजूला झाले.
यावर आधारित असलेल्या राजकारण आणि समाजकारणला एक योग्य दिशा देणाऱ्या एका तेलियाची ही कथा...! तसेच त्या काळावर इतिहास कोरणार्या आणि आपल्याच नावानं देश जन्माला घालणाऱ्या 'अब्दुल अझीझ इब्न सौद' या रांगड्या, पण दिलदार राजाची... अमेरिका आणि इंग्लंडला पहिल्यांदा वेसण घालणाऱ्या इराणच्या काहीश्या चक्रम 'महंमद मोसादेघ' यांची... आणि आपल्या द्रष्टेपणानं व्हेनेझुएला या एरवी नगण्य असणार्या देशाला जगाच्या खेळात महत्त्वाची भूमिका देणार्या 'जुआन पाब्लो पेरेझ अल्फान्सो' यांचीही ही कथा...!!
ConversionConversion EmoticonEmoticon