पाकिस्तानला एवढी वर्ष चारीमुंड्या चीत करण्यात आपल्या राष्ट्राला जे यश आले आहे ते आपल्या लष्करामुळंच. ह्यात मोलाची कामगिरी बजावलेले स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख ज्यांना भारतीय लष्कराचा मानबिंदू म्हणुन गौरविण्यात आलं आहे ते "फील्ड मार्शल सॅम मानकेशा" यांच्या शौर्यकथेच्या गाथा त्यांच्या जवळचे सहकारी मेजर जनरल शुभी सूद यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत. मूळ पुस्तक ईंग्रजीमध्ये प्रकाशित झाले असुन त्याचा मराठी अनुवाद हा बाळ भागवत यांनी केला आहे. हे पुस्तक १५ ऑगस्ट २०१३ रोजी प्रकाशित झालं आहे. मराठीतील पुस्तक रोहण प्रकाशनच्या माध्यमातून प्रकाशित झाले असुन पुस्तकाचे मुखपृष्ठ हे रेश्मा वाळुंज यांनी तयार केले आहे.
एखादे उत्तम राष्ट्र घडविण्यामध्ये जेवढा प्रजेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा हात असतो तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक असा मोलाचा वाटा त्या राष्ट्राच्या लष्कराचा असतो. आपला देश स्वतंत्र होऊन जवळजवळ पाऊणशे वर्ष व्हायला आली आहेत मात्र या कमी कालावधीत आपल्या देशाचं नाव ते मग कोणतंही क्षेत्र असो राजकारण, समाजकारण, आर्थिक, शैक्षणिक किंवा सामाजिक या सर्व पातळींवर आघाडीवर असल्याचं दिसून येतं.
मानेकशा यांचं संपूर्ण आयुष्य हेच एक कोडं वाटावं अश्या पद्धतीने घटित झालं होतं. दुसर्या महायुद्धाच्यावेळी ब्रम्हदेशामध्ये जपानी सैन्याविरुद्ध लढत असताना अक्षरशः तब्बल नऊ गोळ्या लागूनसुद्धा त्यातुन ते बचावले होते. त्यांच्या या निष्ठेमुळे त्यांना ब्रिटिश सैन्याचा मानाचा असा “सैन्य क्रॉस” पदक देऊन गौरव करण्यात आला. तेथून पुढे त्यांच्या यशाचा आलेख मात्र चढताच पाहायला मिळाला. मानेकशा यांच्या आयुष्यातील महत्वाचे आणि त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीला चारचाँद लावणारे १९७१ चे बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध. या युद्धामध्ये त्यांनी योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे कोणत्याही देशाच्या मदतीशिवाय भारताने पाहिले आंतरराष्ट्रीय पातळीवरचे युद्ध जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला.
यावेळी पूर्व पाकिस्तान आणि पाश्चिम पाकिस्तान या दोन्ही आघाडय़ांवर त्यांनी नियोजनबद्ध निर्णय घेऊन उत्तम निर्णयक्षमतेचा आदर्श घालुन दिला. त्यांच्या या कौशल्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीजी यासुद्धा प्रभावित झाल्या होत्या. मानेकशा यांनी एकूण चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पाच लढायांमध्ये सहभाग नोंदवला आहे. ब्रिटिश भारतीय सेना व स्वतंत्र भारतीय सेना या दोन्ही शाखांमध्ये त्यांनी आपली सेवा अर्पण केली आहे. द्वितीय विश्व युध्द, १९४७ चे भारत-पाकिस्तान युद्ध, भारत-चीन युद्ध, १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध, बांग्लादेश मुक्तीसंग्राम या पाच युद्धांमध्ये त्यांचा सहभाग होता. मानेकशा यांनी एक प्रामाणिक व्यक्तिमत्व पूर्ण आयुष्यभर जोपासले. त्याला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागु नये याची पुरेपूर काळजी घेतली. त्यांच्या या कार्यासाठी भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी मानांकित केले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon